टीम झूलेलाल न्यूज़ ! लोकसभेचे मा.खासदार डॉ.उल्हासदादा पाटील यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने जनसेवेची शतकाकडे होणारी वाटचालच म्हणावी लागेल, त्याला कारणही तसेच आहे, डॉ.उल्हासदादा पाटील म्हणजे जनसेवेचा वसा घेतलेले, प्रचंड ऊर्जावान असलेले नेतृत्व. गेल्या अनेक वर्षापासून असंख्य रुग्णांची गरजपुर्ती ठरलेल्या “गोदावरी फाउंडेशनची” निर्मिती करून त्यांनी आरोग्याची गंगा घरोघरी पोहोचवली आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक व्यवस्थेचे अख्ये दालनच खुले करून अनेक शैक्षणिक संस्थांची पायाभरणी केली आहे. यातुनच आरोग्य आणि शिक्षण याचा सुरेख मेळ बसवला आणि राजकीय प्रवाहात असल्यामुळे आरोग्य व शिक्षण यांचे उत्थान करण्याचे काम त्यांनी केले. म्हणून तर जिथे जातील तिथे शिक्षण, आरोग्य, समाजकारण याच विषयान्वे जनसेवेचे व्रत नेहमी बाळगल्याचे दिसुन येते.

 

डॉ.उल्हासदादा पाटील यांच्या जीवनपटलाकडे कटाक्ष टाकला असता “आरोग्यसेवा हीच माझी ऊर्जा”, “शिक्षण सेवा हीच माझी शक्ती” हे ब्रिद जणू त्यांच्या जीवनाशी जुळले आहे असे दिसून येते.आणि हीच “ऊर्जा” हीच “शक्ती” वाढवण्याची, जोपासण्याची त्यांची तळमळ नेहमी दिसून येते., म्हणूनच या दूरदृष्टी असलेल्या स्थितप्रज्ञ कर्मयोगी नेतृत्व असलेल्या डॉ.उल्हासदादा पाटील यांचा वाढदिवस हा गोदावरी फाउंडेशन संचलित सर्व शाखा, विभाग, कर्मचारी, सहकारी, कार्यकर्त्यांचा आनंदाचा जणू सोहळा ठरताना दिसून येत असतो.

डॉ.उल्हासदादा पाटील यांच्या फाउंडेशन मध्ये काम करत असताना प्रत्येकाला आपण भाग्यवान असल्याचे नेहमी वाटते, ‘सेवा’ आणि ‘पेशा’ यांचा एक दुवा म्हणजे डॉ.उल्हासदादा पाटील निर्मित “गोदावरी फाउंडेशन”. सामाजिक, शैक्षणिक, सहकार, कृषक, आरोग्य, व राजकीय अशा विविध अंगाने अंगीकृत असलेले “कर्मयोगी डॉ.उल्हासदादा पाटील”.

तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर।

असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पुरुषः॥

(भागवतगीता अध्याय 3, श्लोक 19)

परिस ही एक काल्पनिक वस्तू आपण ऐकून आहोत या वस्तूचा लोखंडाला स्पर्श झाला तर ती वस्तू लोखंडाचे सोने करते परंतु डॉ.उल्हासदादा पाटील यांचे नेतृत्व इतक्या उच्च प्रतीचे आहे की लोखंडाला नुसते सोने करत नाहीत तर ते लोखंडाला आपले गुणधर्म देऊन परिसच करून टाकतात. म्हणूनच त्यांच्या अवतीभवती त्यांच्या परिसस्पर्शाने जीवनाचे सोने झालेले अनेक सोन्यासारखे लोक आपल्याला पाहायला मिळतात. आरोग्य व शैक्षणिक राजकीय क्षेत्रामध्ये डॉ.उल्हासदादा पाटील यांनी दूरदृष्टी ठेवून कुशाग्र बुद्धीच्या बळावर राजकारण व समाजकारणासोबत यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करीत अनेक पुरस्कार मिळवल्याचे दिसून येते.

पहाटे चारला सुरू होणारी दिनचर्या, कामाप्रती निष्ठा असलेले हेच पहिले उदाहरण आहे. कामाचा झपाटा, काम करण्याची सचोटी, कामे तडीस नेण्याची जिद्द, कोणत्याही कामाचे अभ्यासपूर्ण नियोजन,ही त्यांची खासियत. त्यानंतर यश मिळवूनही स्थितप्रज्ञाप्रमाणे असलेला भाव सर्वांसाठी आदर्शदायी ठरतो.

राजकारण, समाजकारण करणारे नेतृत्व वयाच्या 66 व्या वर्षी तिच दिनचर्या आणि आरोग्य, शिक्षण, समाजकारण क्षेत्रातील व्याप व राबता बघता तेच सातत्य ठेवणारे डॉ.उल्हासदादा पाटील यांच्याकडे बघून सर्वांचे मन थक्क होते.

त्यांचे अनेक गुण आत्मसात करावे असे प्रत्येकालाच वाटत असणार हे मात्र प्रत्यक्षाने मी सांगू इच्छिते.

राजकारणात, समाजकारणात राहून ही आरोग्य, शिक्षण, शेती, उद्योग, साहित्य, कला, विज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान, क्रीडा, नाट्य अशा सर्व विषयांची जाण असलेल्या, सर्व क्षेत्रातील दिग्गजांशी थेट संपर्कात राहून सातत्याने नवनवीन विषयांची माहिती घेत स्वतःला अपडेट ठेवणारे जिज्ञासू व्यक्ती म्हणून डॉ.उल्हास दादा पाटील यांच्याकडे बघता येईल.

त्यांची इच्छाशक्ती खरोखरच सर्वांसाठी प्रेरणा म्हणता येईल यात तीळ मात्र शंका नाही. मग परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीही केवळ प्रयत्न आणि इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्याला अनुकूल ते कसे घडवून आणता येईल हे त्यांच्या जीवनाकडे बघितले की आपल्याला कळेल. त्यांना जेव्हा आजारांशी लढायची वेळ आली होती तेव्हा देखील त्यांनी साक्षात नियतीच्या पुढे आपला शुद्ध हेतू आणि शुद्ध कर्माच्या साह्याने आजारपणात मनाची शुद्धता सिद्ध करून आणि ते युद्ध जिंकून कार्यमग्न, ऊर्जावान, गतीमान अश्या डॉ.उल्हासदादा पाटील यांनी स्वःताला पुन्हा कामात झोकून दिले आहे.

परिस्थिती कितीही गोंधळाची आणि गुंतागुंतीची असली तरी अत्यंत शांतपणे, संयमाने काम करत राहून हवे तसे घडवता येते हे डॉ.उल्हासदादा पाटील यांच्या अनेक निर्णयातून आपल्याला जाणवते.

प्रत्येकाच्या जीवनात सुखदुःख, चढ-उतार, यश-अपयश येतेच. परिस्थितीला वश होऊन अनेकांना आपल्या ध्येयापासून परावृत्त होताना आपण पाहतो. परंतु, रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या विवरे गावात, शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ.उल्हासदादा पाटील यांचा लढत राहून जिंकत राहणे हा स्थायीभावच.

समस्या, अडचण कितीही मोठी असो न डगमगता ध्येयाने त्या अडचणींना, समस्यांना सामोरे जाणे, हे तर डॉ.उल्हासदादा पाटील यांचे रोजचेच काम ! अनेक अडचणी, समस्यांना तोंड देत सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकिय, आरोग्य क्षेत्रातील हे यश त्यांनी गाठले ते कोणतीही सक्षम कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानादेखील केवळ आपल्या असामान्य नेतृत्वामुळे,अथक परिश्रमामुळे , आणि कठोर मेहनतीमुळे.

आई स्व.गोदावरी वासुदेव पाटील हाडाच्या शिक्षिका. यांच्या संस्कारांचा समर्थ वारसाच या यशाच्या डामडौलात दिसून येतो.

सर्वसामान्यांचे असामान्य नेते, कर्तृत्ववान, प्रतिभावान, स्वतंत्र प्रतिमेचे नेतृत्व, कृतिशील विचारांचे, दूरदृष्टीचे नेते, उत्कृष्ट वक्ते, निरपेक्ष समाजभाव जपणारे, निगर्वी अशी अनेक विशेषणे डॉ.उल्हासदादा पाटील यांच्याठायी एकवटलेली दिसतात. अशा या सर्वमान्य, लोकमान्य, जनमान्य दूरदृष्टी असलेले स्थितप्रज्ञ कर्मयोगी-डॉ.उल्हासदादा पाटील यांना विश्वयंत्रचालक विधाता परमेश्वर, ईश्वर दीर्घ व निरोगी, उत्तमोत्तम आरोग्य व आयुष्य देवो. त्यांच्या हातून देव, देश, धर्म, राज्य, समाजाची अशीच उत्तरोत्तर सेवा घडो या सदिच्छांसह मंगलकामना.

प्रा. सौ. अमिता निकम

Don`t copy text!